(जैतापूर / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मिशन जीवन उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील साखरी–नाटे येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरी–नाटे व परिसरातील सुमारे ४०० ते ५०० ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच सुमारे २०० ते २५० ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छापत्रे देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
कार्यक्रमात बोलताना अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी मिशन जीवन आणि मिशन प्रतिसाद या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असून अडचणीच्या प्रसंगी त्यांना तात्काळ मदत मिळावी, तसेच पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, यावर पोलीस प्रशासनाचा विशेष भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमापूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त याच ठिकाणी विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमावेळी साखरी–नाटेचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जमातुल मुस्लिम कमिटीचे पदाधिकारी, ऍक्टिव्ह ग्रुप साखरी–नाटेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.

