(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश काशीराम गुरव (वय २८, रा. तळवडे, ता. राजापूर) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम बाणे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(१) व ७६ तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यातील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील करीत असून, घटनेशी संबंधित सर्व पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

