(चिपळूण /प्रतिनिधी)
तालुक्यातील नागावे परिसरात शनिवारी सायंकाळी नदीपात्रालगत असलेल्या प्लास्टिक साठवण गोडावूनला लागलेल्या आकस्मिक आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोडावूनमध्ये काम सुरू असतानाच आग भडकली; मात्र प्रसंगावधान राखत सहा कामगारांनी वेळीच बाहेर पडत आपला जीव वाचवला.
प्राथमिक माहितीनुसार, गोडावूनलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी जाळण्यात आले होते. कडक उन्हामुळे त्यातून उठलेल्या ज्वाळांनी वेगाने शेजारील प्लास्टिक साठ्याकडे झेप घेतली आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. संबंधित गोडावूनमध्ये भंगार प्लास्टिक पिशव्या धुवून वाळवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी सुमारे तीन ट्रक इतका प्लास्टिक साठा असल्याने ज्वाळांची तीव्रता अधिक वाढल्याचे कामगारांनी सांगितले.
प्लास्टिकच्या ज्वलनशील साठ्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण इमारत धुराच्या लोटांनी वेढली गेली. आगीचा फैलाव इतका वेगवान होता की गोडावूनमधील बहुतांश साहित्य पूर्णतः भस्मसात झाले. सायंकाळपर्यंत ज्वाळा धगधगत असल्याने परिसरात खबरदारीचे वातावरण ठेवण्यात आले होते.
दरम्यान, स्थानिकांच्या मते आग लागल्यानंतर सुरुवातीचा अर्धा तास उलटूनही अग्निशमन दल किंवा पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. त्यामुळे आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात विलंब झाला. त्यानंतर चिपळूण नगरपरिषदच्या Fire Brigade चे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोफळी येथील महाजनको प्रकल्पाकडूनही अग्निशमन बंब पाठवण्यात आला; मात्र वाहनातील पाणीसाठा अपुरा पडल्याने आग विझविण्याच्या प्रयत्नांना अडथळे निर्माण झाले.
सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी गोडावूनचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांकडून औद्योगिक परिसरातील अग्निसुरक्षेबाबत अधिक काटेकोर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.

