(चिपळूण)
शहरातील बहादूरशेखनाका परिसरात किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणालाच मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत संबंधित तरुणाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणातील जखमी तरुणाचे नाव महेश वसंत नलावडे (वय ३२, रा. गांधीनगर वडार कॉलनी) असे आहे. तर विश्वनाथ हणमंत पवार (वय ३५) आणि व्यंकट बद्रि पवार (वय ३०, दोघेही रा. खेर्डी-माळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश नलावडे हा सेंट्रिंगसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी बहादूरशेखनाका परिसरात आला होता. येथील भगवती हार्डवेअर दुकान बंद असल्याने तो वाहनाजवळ थांबला असताना त्याच्या परिचयातील दोघांमध्ये अचानक वाद सुरू झाला. वाद चिघळू नये म्हणून महेश नलावडे मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेला; मात्र त्याच क्षणी दोघांनी त्याच्यावरच संताप व्यक्त करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
यानंतर त्याला खाली पाडून दगडाने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात महेश नलावडे यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५ (२), ११८ (१), ३५२ आणि ३ (५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. किरकोळ वादातून हिंसक वळण घेणाऱ्या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

