( चिपळूण / वार्ताहर )
सामाजिक, कायदेविषयक जनजागृती तसेच माहिती अधिकाराच्या प्रभावी वापराबाबत राज्यभर उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश तानू पेढांबकर यांचा चिपळूण येथील दृष्टी ग्रुपच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
दृष्टी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. जीवन रेळेकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या योगेश पेढांबकर यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर वकिली क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, माहिती अधिकाराबाबत मार्गदर्शन करणे, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू नागरिकांच्या विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणे आणि कायद्याविषयी जनजागृती करणे, या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या असून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगेश पेढांबकर यांच्या समाजहिताच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. भविष्यातही त्यांनी न्याय, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. दांडेकर यांनी दिल्या.
सत्काराला उत्तर देताना योगेश पेढांबकर म्हणाले, “हा सन्मान माझा नसून समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी आणि समाजसेवेसाठी अधिक ताकदीने कार्यरत राहीन.” त्यांनी दृष्टी ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या कार्यक्रमास दृष्टी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. जीवन रेळेकर, माजी नगराध्यक्षा सौ. गौरी रेळेकर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा व दृष्टी ग्रुपच्या संचालिका सौ. प्रणिता कपडेकर, चिपळूण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. दांडेकर, तसेच चिपळूण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

