(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बावनदी येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक उतारावर रविवारी पहाटे पुन्हा एकदा डंपर अपघाताची घटना घडली. जयगडहून मुंबईकडे कोळसा घेऊन निघालेला डंपर वळणदार उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४३ वाय ५९९८ क्रमांकाचा डंपर पहाटे साडेचारच्या सुमारास उतारावरून जात असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला. तीव्र उतार आणि वळण यामुळे वाहन थेट डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाले. या अपघातात चालक अलगुराय (वय ४०, रा. पाटणा, Bihar) यांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर जखमी चालकाला तत्काळ जगदगुरु रामानंदचार्य नरेंद्र महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर हातखंबा पोलीस मदत केंद्र तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले.
दरम्यान, बावनदी उतारावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड आणि संभाव्य ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारी वाहने या मार्गावर दिवस-रात्र राजरोसपणे धावत असल्याचे दिसून येते. बावनदीसारख्या तीव्र उताराच्या भागात अशा वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे हा उतार वाहनचालकांसाठी धोक्याचा बिंदू ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

