(लोटे / खेड)
लोटे MIDC परिसरात पुन्हा एकदा औद्योगिक प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Laxmi Organic Industries Ltd या कंपनीतून प्रक्रिया केलेले पाणी नेणारा टँकर ग्रामस्थांनी अडवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतून प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे Common Effluent Treatment Plant (CETP) येथे नेले जात होते. मात्र, संशय आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी हा टँकर अडवला. त्यानंतर CETP प्रशासनाने टँकर गेटबाहेरच थांबवण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच वाढला. टँकरमधील पाणी नेमके कोणत्या प्रकारचे आहे, याबाबत CETP प्रशासन किंवा चालक यांच्याकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे परिसरात संभ्रम आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन सुरू असूनही कंपनीकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंदोलनकर्ते राजेंद्र आंब्रे यांनी आरोप केला की, “उत्पादनातून निर्माण होणारे वेस्टेज थेट CETPमध्ये टाकले जात आहे, ज्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.”
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित टँकर थेट कंपनीच्या गेटवर आणत जोरदार निषेध नोंदवला. यावेळी स्थानिक प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.
दरम्यान, या गंभीर आरोपांवर Laxmi Organic Industries Ltd प्रशासनाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोटे MIDCमधील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, स्थानिकांच्या आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

