(नाशिक)
राज्यभर सध्या बोगस बाबा अशोक खरात याच्या कथित कारनाम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. कथित ज्योतिष आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या खरात याच्याविरोधातील लैंगिक शोषण प्रकरण दिवसागणिक गंभीर होत असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओंची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या तक्रारींपेक्षा आणखी अनेक पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘सिद्ध पूजा’च्या नावाखाली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा ‘सिद्ध पूजा’ आणि ‘सर्पसंवाद’च्या नावाखाली भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत होता. तो स्वतःला सर्पदेवतेशी संवाद साधणारा म्हणून सादर करत असे आणि “स्वर्गातून सर्पदेवता पृथ्वीवर आणतो” असा दावा करत लाखो रुपये उकळत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘सर्पदेवता’ दाखवण्यामागचा कथित बनाव. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात साप नसून ड्रोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटर्सच्या मदतीने तयार केलेला रिमोट ऑपरेटेड साप वापरला जात होता. अंधारात विशेष वातावरण तयार करून भाविकांना “सर्पदेवता प्रत्यक्ष आली आहे” असा भास निर्माण केला जात होता. त्यामुळे अनेक जण या फसवणुकीला बळी पडले.
मंदिरात ‘विशेष पूजा’, लाखोंची उकळपट्टी
ईशान्येश्वर मंदिर येथे ‘सर्पसंवाद पूजा’ आयोजित केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पूजेसाठी भाविकांकडून लाखो रुपयांची मागणी केली जात होती. “तुमची सर्व समस्या सर्पदेवता सोडवेल” असा दावा करून लोकांना आकर्षित करण्यात येत होते.
‘माईंडगेम’ आणि ‘ओश्नो जल’चा…
भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांबाबत आता दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासात त्याच्या ‘माईंडगेम’चा पर्दाफाश झाला असून, तो भाविकांना मानसिकदृष्ट्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड होत आहे. खरातकडे येणाऱ्या व्यक्तींना तो सुरुवातीपासूनच आपल्या बोलण्याच्या प्रभावाने प्रभावित करत असे. पती आणि मुलांना आत बसवून पत्नीला बाहेर थांबवले जात असे. त्यानंतर “दैवी शक्ती”चा हवाला देत पतीच्या मनात संशयाची बीजे पेरली जात असत, अशी माहितीही आता समोर येत आहे.
“तुमचा मुलगा तुमचाच नाही” किंवा “तुमच्या आयुष्यातील अडचणींना तुमची पत्नी जबाबदार आहे” अशा खोट्या विधानांद्वारे तो पतीच्या मनावर गंभीर परिणाम करत असे. त्याचबरोबर, “आनंदी जीवनासाठी पती-पत्नीने एकमेकांपासून दूर राहा” असा सल्ला देत तो दाम्पत्यांमध्ये दुरावा निर्माण करत असे. खरात पती आणि पत्नी या दोघांनाही स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या मनात एकमेकांविषयी अविश्वास निर्माण करत असे. “ही गोष्ट एकमेकांना सांगायची नाही” अशी अट घालून संवादच तुटेल अशी परिस्थिती निर्माण केली जात होती.
काही दिवसांनी पत्नीला एकटीला बोलावून पतीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली जात असे. “पती विश्वासघातकी आहे” असे सांगून तिच्या मनातही संशय निर्माण केला जात असे. या योजनाबद्ध पद्धतीमुळे दाम्पत्यांमध्ये मोठी दरी निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अशोक खरात कथितरित्या ‘ओश्नो जल’ नावाने पाणी देत असे, ज्यामध्ये वायग्रा गोळ्या मिसळल्या जात असल्याचा आरोप आहे. माहितीनुसार, पाण्यात अनेक गोळ्या मिसळून त्याचे ग्लास बनवून काही श्रीमंत व VIP व्यक्तींना दिले जात. या ‘जल’ला मोठी मागणी असल्याचेही सांगितले जाते. काही प्रतिष्ठित व्यक्ती खास वाहन पाठवून हे पाणी मागवत असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.
‘मी कृष्णाचा अवतार, तू राधा’ भीती आणि अंधश्रद्धेचा फायदा
नाशिकमधील पीडित महिलेच्या तक्रारीतून खरातने विश्वास संपादन करून अनेक वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या एफआयआरनुसार, २०१९ साली नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात तिची अशोक खरातशी ओळख झाली. आपल्याकडे विशेष “दैवी शक्ती” असल्याचा दावा करत खरातने महिलेचा विश्वास जिंकला. तिच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली तो तिच्याशी जवळीक वाढवत गेला.
२०२१ मध्ये पीडितेचा साखरपुडा मोडल्यावर खरातने तिच्याकडून ५० हजार रुपये घेत ‘पुष्कराज’ खडा दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये कार्यालयात बोलावून प्रसाद म्हणून पेढे आणि खारट आणि कडवट पाणी दिल्यामुळे तिला गुंगी आली. याच अवस्थेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला, असा आरोप आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरही खरातने तिचा पाठलाग करत पुन्हा अत्याचार केला. “मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझी मागच्या जन्मातील राधा आहेस” असे सांगत मानसिक दबाव टाकला. तसेच “तू माझी प्रेयसी झाली नाहीस तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल” अशी धमकी देऊन तिला भीतीच्या छायेत ठेवले.
धक्कादायक पद्धत
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, खरात महिलांना प्रसाद म्हणून पेढे आणि कडवट-खारट पाणी देत असे. त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायला लावून त्यांच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेवत कानाजवळ काहीतरी पुटपुटत असे. या प्रक्रियेदरम्यान महिलांना गुंगी येत असे आणि त्याचा फायदा घेत तो अश्लील कृत्ये करत असल्याचा आरोप आहे..याचबरोबर, महिलांसोबत आलेल्या नातेवाईकांना ‘ध्यान साधना’च्या नावाखाली बाहेर बसवून ठेवले जात होते, जेणेकरून कोणालाही आत काय सुरू आहे याची कल्पना येऊ नये.
तक्रारीनंतर प्रकरण उघड
शेवटी सततच्या अत्याचारांना कंटाळून पीडित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आला असून, पोलीस आता या प्रकरणातील इतर संभाव्य पीडितांचा शोध घेत आहेत.
बड्या व्यक्तींचीही उपस्थिती?
सूत्रांच्या माहितीनुसार, या ठिकाणी काही VIP व्यक्तींचीही ये-जा होती. त्यांच्या कामे पूर्ण झाल्याच्या चर्चेमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वास निर्माण होत गेला आणि त्यामुळे आणखी भाविक या जाळ्यात अडकत गेले. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, रिमोट ऑपरेटेड साप, आर्थिक व्यवहार आणि आक्षेपार्ह व्हिडिओ यांचा तपास केला जात आहे. पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या लैंगिक शोषणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात किती महिला आणि धक्कादायक प्रकरणे समोर येतात आणि तपासातून काय सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

