(खेड /रत्नागिरी)
लोटे परशुराम MIDC येथील औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. वेस्टबंगाल सध्या रा. आवाशी, खेड) याची सोमवारी (१६ मार्च) मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तिघांवर पोहोचली असून उर्वरित तिघांवर अद्याप अतिदक्ष विभागात उपचार सुरू आहेत.
६ मार्च रोजी कंपनीतील अभिक्रिया यंत्रात अचानक झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. स्फोटाच्या तीव्रतेमुळे उष्ण रसायन थेट कामगारांच्या अंगावर उडाले, तर उत्पादन विभागाचे छप्पर कोसळल्याने परिस्थिती अधिक भीषण झाली. या दुर्घटनेत एकूण अकरा कामगार जखमी झाले होते. त्यापैकी सहाजणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने नॅशनल बर्न्स सेंटर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. यापूर्वी ६० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या मुरडे येथील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) यांचा ११ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर १२ मार्च रोजी लातूर येथील असद खान या कामगाराचाही मृत्यू झाला. आता सुजन दासच्या मृत्यूमुळे या दुर्घटनेने आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे.सुजनच्या पार्थिवावर मंगळवारी आवाशी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच घरात बहिणीच्या विवाहाचा आनंद साजरा झाला होता; मात्र अचानक आलेल्या या दुःखद घटनेने दास कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मूळचे बंगालमधील दास कुटुंब मागील तीस वर्षांपासून आवाशी येथे वास्तव्यास आहे. वडील गोपाल दास यांनी ठेकेदारीची कामे करून संसार उभा केला आणि आवाशी येथे स्वतःचे घर बांधले. सुजनचे शिक्षण आवाशी व गुणदे परिसरात झाल्याने स्थानिक युवकांमध्ये त्याचा मोठा वावर होता. दरम्यान, सलग होत असलेल्या मृत्यूंमुळे कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून औद्योगिक सुरक्षेच्या निकषांची कठोर चौकशी करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

