(मुंबई / रत्नागिरी)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद च्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठी रंगभूमीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. आगामी १०१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली.
मोहन जोशी यांनी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून दीर्घकाळ प्रभावी योगदान दिले आहे. रंगभूमीवरील त्यांच्या सशक्त अभिनयामुळे ते घराघरात पोहोचले. यापूर्वी त्यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठी नाट्यविश्वात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या अनुभवामुळे आगामी नाट्य संमेलनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरीत १०० व्या नाट्यसंमेलनाची सांगता
दरम्यान, ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्यमहोत्सवाची सांगता अखेर निश्चित झाली आहे. हा सोहळा २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान रत्नागिरी येथे उत्साहात पार पडणार आहे. या तीन दिवसांच्या महोत्सवात विविध नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रंगभूमीशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरातील नामांकित कलाकार आणि रंगकर्मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या निर्णयांमुळे मराठी रंगभूमीत नवचैतन्य निर्माण झाले असून, कोकणात होणाऱ्या या सोहळ्यामुळे नाट्यसंस्कृतीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मी 13 वर्षे नाट्य परिषदेचा अध्यक्ष होतो. या काळात 13 नाटय़संमलने झाली. संमेलनाशी मी अगदी जवळून जोडला गेलेलो आहे. नाट्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर नाटय़संमेलनाध्यक्ष व्हावे ही माझी इच्छा होतीच. ती आता पूर्ण होतेय. खूप आनंद वाटतोय. आता नव्याने नाटय़क्षेत्राशी जोडला जाणार आहे. या क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. बॅकस्टेज कामगारांचे विषय आहेत. अशा अनेक मुद्दय़ांवर एकत्र येऊन काम करावे लागेल.
– मोहन जोशी

