( नवी दिल्ली )
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काय असावी, यावर चर्चा सुरू असतानाच माजी ‘RAW’ प्रमुख ए. एस. दुलत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इराण हे युद्ध हारणार नाही किंवा मागेही हटणार नाही, भारताने इराणच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माध्यमांशी बोलताना ए. एस. दुलत म्हणाले की, भारत आणि इराण यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आहेत. “इराण नेहमीच भारताच्या पाठीशी राहिला आहे, त्यामुळे या संघर्षात भारतानेही त्याला साथ द्यावी,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर हे युद्ध इराण हरवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी Israel आणि United States यांनी इराणवर हल्ले केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. प्रत्युत्तरादाखल Iran ने इस्रायलसह आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या युद्धाचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात भारताचा ध्वज असलेली २२ जहाजे अडकून पडली आहेत. या जहाजांवर सुमारे १६.७ लाख टन कच्चे तेल, ३.२ लाख टन एलपीजी आणि जवळपास दोन लाख टन एलएनजी साठा आहे.
शिपिंग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांच्या माहितीनुसार, ही जहाजे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. युद्ध सुरू झाल्यावेळी एकूण २८ भारतीय जहाजे या भागात होती. त्यापैकी काही जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाली असली, तरी सध्या २२ जहाजे अद्याप अडकलेली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, या जहाजांवरील सर्व ६११ भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, वाढत्या तणावामुळे जागतिक व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि भारताच्या आयातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

