( नवी दिल्ली )
देशभरात चर्चेत असलेल्या हरीश राणा यांच्या प्रकरणाला आता अत्यंत भावूक वळण आले आहे. गेली १३ वर्षे कोमात राहून मृत्यूशी झुंज देणाऱ्या ३२ वर्षीय हरीश राणा यांच्या इच्छामृत्यू प्रक्रियेला Supreme Court of India कडून परवानगी मिळाल्यानंतर दिल्लीतील All India Institute of Medical Sciences (एम्स) येथे टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्या हरीश यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून हटवून सामान्य बेडवर हलवण्यात आले आहे. एम्समधील सूत्रांच्या माहितीनुसार, व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी १० तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष मेडिकल बोर्ड नियुक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पोटातील अन्ननळी बंद करण्यात आली होती. तसेच आता इतर लाईफ सपोर्ट सिस्टिम्सही काढण्यात आल्या आहेत. मात्र, मेंदूसाठी आवश्यक काही औषधे अद्याप सुरू आहेत.
या प्रकरणात समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे देशभरात भावना दाटून आल्या आहेत. ब्रह्मकुमारी संस्थेच्या साधिका भगिनी कुमारी लवली यांनी हरीश यांच्याशी अखेरचा संवाद साधल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांनी हरीश यांच्या मस्तकावर चंदनाचा टिळा लावून प्रार्थना केली. व्हिडिओमध्ये हरीश यांच्या डोळ्यांची हालचाल आणि श्वासोच्छ्वास दिसत असल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या.
हरीश राणा यांचा हा दुर्दैवी प्रवास २०१३ मध्ये सुरू झाला. चंदीगड विद्यापीठात बी.टेकचे शिक्षण घेत असताना रक्षाबंधनाच्या दिवशी ते पीजी च्या चौथ्या मजल्यावरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अपघातानंतर ते कोमात गेले आणि गेली १३ वर्षे हालचाल न करता जीवनाशी संघर्ष करत राहिले. कुटुंबाने शक्य ते सर्व उपचार केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर, या दीर्घ संघर्षानंतर कुटुंबाने Supreme Court of India चे दरवाजे ठोठावले आणि त्यांना इच्छामृत्यूची परवानगी मिळाली. हा निर्णय कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक असला, तरी त्यांनी परिस्थितीसमोर हार मानत हा कठीण निर्णय स्वीकारला.
दरम्यान, एम्स प्रशासनाने हरीश यांच्या कुटुंबासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यांच्या आई-वडिलांना रुग्णालयातच राहण्याची सोय देण्यात आली असून, डॉक्टरांकडून दररोज समुपदेशन केले जात आहे. या कठीण प्रसंगात कुटुंबाला मानसिक आधार मिळावा यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. हरीश राणा यांची ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर दीर्घकाळ आजाराशी झुंज देणाऱ्या कुटुंबांच्या वेदना आणि वास्तवाचे प्रतीक ठरत आहे.

