(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निवळी बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता चिरे टाकून अडविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध अखेर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून सार्वजनिक मार्गावर अडथळे उभे करून नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीसह बहुजन समाज पार्टीने अप्पर पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिनांक १६ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निवळी बौद्धवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता मोठे चिरे टाकून जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्याचे उघड झाले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. अचानक बंद झालेल्या मार्गामुळे ये-जा पूर्णपणे ठप्प झाली आणि ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेत, “पोलीस प्रशासन घटनास्थळी येईपर्यंत येथून हलणार नाही,” असा ठाम इशारा दिला होता. दरम्यान अर्धा तासानंतर ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत रस्त्यात टाकलेले चिरे बाजूला केले आणि बंद झालेला मार्ग पुन्हा सुरू केला. मात्र, बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला नाही, ही बाब ग्रामस्थांनी पुन्हा ठळकपणे पुढे आणली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे मार्ग अडविण्यात आला होता आणि त्या वेळी संशयित व्यक्तींची नावेही पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा तोच प्रकार घडूनही गुन्हा ‘अज्ञात’ व्यक्तीवर नोंदविला गेल्याने तपासाच्या गंभीरतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
या प्रकरणी जितेंद्र जयवंत सावंत (वय ३३, रा. निवळी बौद्धवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रस्ता बंद करण्यामागील हेतू आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. गावातील मार्गांवर मनमानी अडथळे उभे करण्याच्या घटनांकडे प्रशासनाने आता अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. रस्त्यावर मोठे चिरे टाकून मार्ग रोखणे हे अचानक घडलेले किंवा अपघाती स्वरूपाचे कृत्य नसून, त्यामागे मानवी हस्तक्षेप स्पष्टपणे दिसून येतो, अशा प्रकारे रस्ता बंद करण्यासाठी नियोजन, साधने आणि जागेची माहिती आवश्यक असते. त्यामुळे हे कृत्य नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले, याचा शोध घेणे पोलिसांसमोरचे आता खरे आव्हान ठरणार आहे.

