(रत्नागिरी)
केंद्र पुरस्कृत उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवारी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडली.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीत राबविण्यात येत असून, वय वर्षे 15 व त्यापुढील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
21सप्टेंबर सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत जिल्ह्यातील विविध परीक्षा 2067केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आली. 14065 (10580+3475) पैकी 13770 (10365+3405) 98% परीक्षार्थ्यांनी सहभाग नोंदवून परीक्षेला हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्याला 9548 इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. या व्यापक सहभागामुळे जिल्ह्यातील नवसाक्षरता मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला असून, परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे निरक्षरतेचे निर्मूलन होऊन समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केले.
नवभारत साक्षरता अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून रत्नागिरीची निवड झाली होती. याबद्दल शिक्षणाधिकारी व योजना अधिकारी श्री. किरण लोहार यांना दिल्ली येथे राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. याआधीही नवभारत साक्षरता कार्यक्रम 2023-24 अतिउत्कृष्ट कामाबद्दल तत्कालीन शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांचे हस्ते शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार यांना गौरवण्यात आले होते.
अचूक नियोजन, त्यानुसार केलेली कार्यवाही, यंत्रणेतील सर्व घटकाचे सहकार्य, सातत्यपूर्ण काम व मार्गदर्शन यामुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात नंबर एक ठेवण्यात यश आले. सर्व जिल्हा स्तर कार्यालयीन यंत्रणा, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी परीक्षा भेटी दिल्या, यावेळी असाक्षर यांचा परीक्षेवेळचा उत्साह वाखाणण्या सारखा होता. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात परीक्षा संपन्न झाली.

