(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देशासाठी प्राणार्पण केलेल्या पोलीस हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलिस स्मृती दिन २०२५ रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने आज मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी पोलिस मुख्यालय येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहीद जवानांना अभिवादन करत त्यांच्या अतुलनीय शौर्याची आणि कर्तव्यनिष्ठेची आठवण करून देण्यात आली.
दि. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे गस्त घालत असलेल्या भारतीय पोलीस दलाच्या दहा जवानांवर चिनी सैन्याने केलेल्या अचानक हल्ल्यात हे जवान वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस देशभर पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी दि. ०१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देशभरातील विविध पोलीस दलांतील एकूण १९१ पोलीस अधिकारी व अंमलदार कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रत्नागिरी येथे सकाळी ८ वाजता आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास ना. डॉ. उदय स्वरूपा रविंद्र सामंत, मंत्री (उद्योग व मराठी भाषा), पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, तसेच कोस्टगार्ड कमांडंट श्री. रोशन लाल, शैलेश गुप्ता, कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. संदीप कृष्णा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. उदय सामंत यांनी या प्रसंगी शहीद जवानांना अभिवादन करणारा संदेश वाचून दाखवला. त्यानंतर स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून सर्व मान्यवरांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम (लांजा), जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र कुळसंगे, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सौ. स्मिता सुतार तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

