(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील ८० फूट महामार्गावरील भगवती किल्ला रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये घुसून शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी संध्या कोसुंबकरसह चौघांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हॉटेल चालकासह आणखी दोघे जखमी झाले असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवम संजय शिवलकर (वय २८, रा. वरचीवाडी, मांडवी, ता. जि. रत्नागिरी) यांचे भगवती किल्ला रोडलगत ‘हॉटेल शिव’ नावाचे हॉटेल आहे. शनिवारी (११ जुलै) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेलसमोर ५० ते ६० गुरे बसली होती. त्यातील एका गाईला कुत्र्याने चावा घेतल्याने ती आक्रमक बनून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या अंगावर धावून जात होती. त्यामुळे शिवम शिवलकर हे परिसरातील कुत्र्यांना हातवारे करून हाकलत होते. याचवेळी संशयित आरोपी संध्या कोसुंबकर व तिच्यासोबत असलेले अन्य तीन तरुण मोबाईलवर चित्रीकरण करत हॉटेलमध्ये शिरल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यांनी हॉटेलमधील कर्मचारी निलेश किसन शिरधनकर यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादीचे आई-वडील पुढे सरसावले असता, त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, फिर्यादीने चित्रीकरण थांबविण्याची विनंती केल्यानंतर वाद अधिकच चिघळला. आरोपींपैकी एका तरुणाने निलेश शिरधनकर यांच्या नाकावर लोखंडी ‘फाईट’ने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना सोडविण्यासाठी गेलेल्या शिवम शिवलकर यांच्या उजव्या हातावरही लोखंडी वस्तूने वार करून दुखापत करण्यात आली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या समिधा राकेश पिलणकर यांना संशयित आरोपी महिलेने ढकलून दिल्याने त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संध्या कोसुमकर व अन्य तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) तसेच मारहाण, दुखापत, शिवीगाळ आणि सामूहिक हेतूशी संबंधित इतर कलमांनुसार गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

