(वैभव पवार / गणपतीपुळे)
गणपतीपुळेतील केदारवाडी परिसरात एका घरात मोठी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹२ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना जयगड सागरी पोलिसांनी अवघ्या पाच तासांतच तपास करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
घटनेचा तपशील
२६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता विरेंद्र शांताराम गोसावी (वय ४२, व्यवसाय–लिंबूपाणी स्टॉल) हे कुटुंबासह गणेशोत्सवासाठी मूळगावी कडवईला गेले होते. घराची चावी शेजारीणीकडे देऊन त्यांनी कोंबड्यांची देखभाल करण्यास सांगितले होते.
२७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएक वाजता शेजारीण सरिता पालकर घरात गेल्या असता कपाट उघडलेले आणि सामान अस्ताव्यस्त टाकलेले दिसले. त्यांनी लगेचच गोसावी यांना फोनवर माहिती दिली. गोसावी कुटुंब तातडीने गणपतीपुळे येथे परतले असता घरातील कपाट उचकटून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले.
चोरीस गेलेले ऐवज
सोन्याचा हार (११ ग्रॅम) – ₹५५,०००/-
मंगळसूत्र (७ ग्रॅम) – ₹३५,०००/-
दोन सोन्याच्या चैन (एकूण ९ ग्रॅम) – ₹४५,०००/-
चार जोड कानातले (७ ग्रॅम) – ₹३५,०००/-
सोन्याचे मणी व डवले (२ ग्रॅम) – ₹१०,०००/-
दोन अंगठ्या (४ ग्रॅम) – ₹२०,०००/-
मुलाचे ब्रेसलेट (२ ग्रॅम) – ₹१०,०००/-
नथ (१ ग्रॅम) – ₹५,०००/-
चांदीच्या साखळ्या (१० ग्रॅम) – ₹१,२००/-
रोख रक्कम – ₹२०,०००/-
एकूण ऐवज – ₹२,३६,२००/-
आरोपींना त्वरित अटक
सहा. पोलीस निरीक्षक यांना या घटनेची माहिती मिळताच कोणताही विलंब न लावता दोन टीम तयार करून स्वतः फिल्डवर उतरून गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दाखल तक्रारीनंतर तत्पर कारवाई करून २८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता दोघांना अटक केली आहे. आरोपी क्र.१ – रोशन सुरेश जाधव (वय २१, रा. मेढे तर्फे फुणगुस, संगमेश्वर. सध्या रा. गणपतीपुळे), आरोपी क्र.२ – हैदर अजीज पठाण (वय २७, रा. झारणी रोड, रत्नागिरी. सध्या रा. गणपतीपुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीकडे अधिक चौकशी करता यातील आरोपी हैदर पठाण हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. ते हैदर पठाण याच्यावर राज्यात तसेच जिल्ह्यात जवळपास 10 ते 12 गुन्हे दाखल असल्याचे समजते. इतक्या जलद गतीने तपास केल्या बद्दल जयगड गणपतीपुळे परिसरातून जयगड पोलीस टीम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अटकेवेळी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करण्यात आले असून, आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना जामिनाच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३२/२०२५ भा.दं.वि. कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उपनिरीक्षक दिडपसे व सहकारी करत आहेत.
वरील कामगिरी ही पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक दीडपसे, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल गुरव, पोलीस हवालदार राहुल घोरपडे, मिलिंद कदम, मंदार मोहिते, निलेश भागवत, संतोष शिंदे, संदेश मोंडे, सायली पुसाळकर, निलेश गुरव, पवन पांगरीकर, आदित्य अंकार यांनी केली आहे.

