(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा नजीक असलेल्या चरवेली गावाजवळ एलपीजी गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना आज (गुरुवारी) सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना चरवेली गावाच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावर उलटला. टँकरमध्ये एलपीजी गॅस असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. टँकरची तपासणी केल्यानंतर कोणतीही गॅस गळती नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, मोठ्या क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

