(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याबाबत ग्राम विकास विभागाने दिनांक २८ एप्रिल,२०२२ रोजी परिपत्रक जारी केले आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिकांना पदोन्नतीसाठीचे सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद व्यपगत झाल्याने सदरच्या परिपत्रकात अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना तीन लाभांच्या सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्रदान करताना त्यांना उपलब्ध असलेल्या पदोन्नतीच्या पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा असे नमूद आहे. सदरचा शासननिर्णय/ परिपत्रक जारी होऊन चार वर्षे होत आली तरी रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी पर्यवेक्षिकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभापासून वंचित ठेवले आहे.
कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत प्रशासनाला विनंती केल्यानंतर १० आणि २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ११ ऑगस्ट २०२५ रोजी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने पत्रक जारी केले आहे. मात्र शासननिर्णय जारी होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटून आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश होऊन पाच महिने उलटून गेल्यावरही आजरोजीपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नसल्याने याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई अथवा चालढकल होत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे.
विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या वित्त लब्धीवर व्याज देण्याची तरतूद असल्याने कर्मचाऱ्यांना गेली दोन ते अडीच वर्षे आश्वासित योजनेपासून वंचित ठेवल्याने आता जि.प. प्रशासन या कालावधीतील थकबाकीसोबत व्याजही कर्मचाऱ्यांना देणार का ? असा सवालही उपस्थित होताना दिसत आहे.

