(रत्नागिरी)
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार वैष्णवी सुशील फुटक (रत्नागिरी), धन्वंतरी पुरस्कार डॉ. गजानन केशव केतकर (साखरपा), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती अनिरुद्ध अनंत ठाकूर (नाटे) यांना जाहीर झाला आहे. आचार्य नारळकर पुरस्कार प्रज्ञेश प्रभाकर देवस्थळी (आडिवरे), आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप पुरुषोत्तम विष्णू काजरेकर (कुडाळ) यांना देण्यात येणार आहे. उद्योजक पुरस्कार प्रशांत गौतम आचार्य व हृषिकेश विनायक सरपोतदार (रत्नागिरी) आणि उद्योगिनी पुरस्कार सौ. कांचन समीर चांदोरकर (लांजा) व कृषीसंजीवन पुरस्कार अतुल अनंत पळसुलेदेसाई (व्हेळ, लांजा) यांना देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर उपस्थित राहणार आहेत. स्वास्थ्य : नवी पिढी-नवी आव्हाने या विषयावर डॉ. किंजवडेकर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाला कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सदस्य, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र शंकर किंजवडेकर हे 1991 पासून कमलेश मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल येथे कंसल्टिंग पेडिअॅट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत. इंडियन अकादमी ऑफ पेडिअॅट्रिक्सचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय पेडिअॅट्रिक असोसिएशनच्या कमिटीचे सदस्य, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांची पुस्तके, शोधनिबंध प्रकाशित झालेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह विविध राज्यांत अनेक व्याख्याने दिली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अबूधाबीमध्ये समन्वयक, पॅनलिस्ट, सिंगापूर, शेंगेन येथे सत्र समन्वयक, युएईमध्ये व्याख्याते म्हणून भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे व्याख्यान उद्बोधक ठरणार आहे.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची माहिती
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार वैष्णवी सुशील फुटक (मु. पो. टिके फुटकवाडी रत्नागिरी) : ही इयत्ता नववीत शिकत असून रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी आहे. राष्ट्रीय खो -खो पट्टू आहे. १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचे योगदान आहे. तसेच १४ वर्षाखालील कुमारी गट राज्यस्तरीय स्पर्धा, धाराशिव येथे १८ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा, अहिल्यानगर येथे १९ वर्षांखालील राज्यस्तरीय खो खो स्पर्धा गाजवल्या आहेत. डेरवण आणि अस्मिता, खेलो इंडिया स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. भाई नेरूरकर चषक स्पर्धेतही ती चमकली आहे. क्रीडा शिक्षक विनोद मयेकर व प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे.
धन्वंतरी पुरस्कार डॉ. गजानन केशव केतकर (साखरपा) : यांनी कोल्हापूर व मुंबईच्या पोदार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले. १९७५ मध्ये साखरप्यात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. खेडेगावात अनेक असुविधांचा सामना करत सेवायज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहेत.
आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती, अहिताग्नी अनिरुद्ध अनंत ठाकूर (नाटे) : १९७२ पासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आहेत. आणीबाणीच्या वेळेस ४ महिने त्यांनी रत्नागिरीच्या कारागृहात तुरुंगवास भोगला. १९९९ पासून त्यांनी आध्यात्मिक वाटचाल सुरू केली. मार्च १९९० मध्ये बार्शी (सोलापूर) येथे ३८५ दिवस गवामयन संवत्सर सत्रामध्ये पत्नीसह सहभाग घेतला. एक वर्ष चालणाऱ्या यज्ञामध्ये गाईच्या तुपाच्या, पुरोडाशाच्या व सोमवल्लीच्या रसाच्या आहुती दिल्या. यज्ञसत्र संपल्यावर पुन्हा अग्नी घेऊन नाटे गावी परतले. जून २००१ पासून आजगायत अग्नीहोत्री सकाळ-संध्याकाळी होम सुरू आहे. हे व्रत स्वीकारताना सर्व कडक नियम ते पाळत आहेत. त्यांच्यासारखे अग्नीहोत्री महाराष्ट्रात १३ व भारतात १५० आहेत.
आचार्य नारळकर पुरस्कार प्रज्ञेश प्रभाकर देवस्थळी (आडिवरे) : टी.व्ही. वरचे शहरी झगमगटाचे जीवन सोडून आपल्या गावासाठी काहीतरी करावे या भावनेने गावात आले. श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेदर आडिवरे येथे माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उत्तम सूत्रसंचालक व मुलाखतकार आहेत. हुशार व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता सहकार्य, वैद्यकीय उपचारांसाठी मदत ते करतात. “कर्तव्य प्रतिष्ठान” या ट्रस्टमार्फत २०१७ पासून सामाजिक काम सुरू आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना हे सुद्धा कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतिगृहाचे विद्यार्थी होते. यापूर्वी त्यांना राज्य नाट्य पुरुष अभिनय पुरस्कार, पित्रे फाउंडेशन “साधन व्यक्ती” पुरस्कार प्राप्त आहेत. रत्नागिरी आकाशवाणी उदघोषक, E Tv मराठी वृत्तनिवेदक, पुरुषोत्तम करंडक पुणे नाट्य परीक्षक, आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा परीक्षक म्हणून कामगिरी केली आहे.
आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप पुरुषोत्तम विष्णू काजरेकर (जांभवडे, ता. कुडाळ) : कोणत्याही संस्थेत व गुरुकडे कीर्तन शिक्षण घेतले नाही. परंतु घरामध्ये दर शनिवारी भजन, कीर्तनाच्या वह्यांमधून व मामांकडून माहिती घेऊन कीर्तने केली. चुलत भावंडांची कीर्तने ऐकून, मिळालेल्या मार्गदर्शनावरून कीर्तने करत आहेत. परमार्थसाधनालयात पौष महिन्याच्या उत्सवात गेली ३५ वर्षे कीर्तने करत असून राम नवमी, हनुमान जन्मोत्सव, नवरात्रोत्सव, दत्त जयंती उत्सवामध्ये सलग पंधरा- वीस वर्षे कीर्तने करत आहेत.
उद्योजक पुरस्कार प्रशांत गौतम आचार्य (आबलोली, गुहागर) व हृषिकेश विनायक सरपोतदार (आंजणारी, लांजा) : हे दोघंही कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतीगृहाचे सहकारी. सर्व शिक्षण आणि एक वर्ष नोकरी एकाच ठिकाणी करून १ सप्टेंबर २०१२ साली आर्यक सोल्युशन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीची स्थापना केली. छोट्या दुकानदारांना सॉफ्टवेअर सेवा देण्यापासून आज आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स, मॅन्युफॅक्चरिंग कंपनींनाही सेवा देत आहेत. जगभरातील दहापेक्षा जास्त देशांमधील ग्राहक आर्यक सोल्युशन्सच्या सेवांचा लाभ घेत आहेत. दररोज शंभरपेक्षा जास्त देशांमधील युजर्स आर्यकने डेव्हलप केलेली सॉफ्टवेअर्स वापरतात.
कृषीसंजीवन पुरस्कार अतुल अनंत पळसुलेदेसाई (व्हेळ, लांजा) : यांचे पौरोहित्याचे शिक्षण झाले आहे. घरचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने व्हेळ येथे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. मोठ्या भावाच्या मदतीने त्यांनी कलिंगड, काकडी, भाजीपाला शेती करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेती व्यवसाय वाढवला आहे.
उद्योगिनी पुरस्कार सौ. कांचन समीर चांदोरकर (लांजा) : बीएस्सी अॅग्रीकल्चर झालेल्या सौ. कांचन चांदोरकर या २०१८ पासून जोशी फुड्सच्या संचालिका म्हणून काम पाहत आहेत. त्यांची विविध खाद्यपदार्थ, नमकीन बनवण्याची फॅक्टरी असून ४५ महिला, पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत. त्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्वावलंबी होण्याकरता प्रयत्न करत आहेत. पर्यावरण संस्था, जनकल्याण समिती, स्वावलंबी भारत अभियानातही सामाजिक कार्य करत आहेत.

