(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या सन 2024–25 च्या भरती प्रक्रियेला मिरजोळे एमआयडीसी येथील क्रीडा संकुलात शुक्रवारी (दि. 13 फेब्रुवारी) शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे भरतीचा पहिलाच दिवस कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीपणे पार पडला.
शिपाई आणि चालक शिपाई अशा एकूण 108 पदांसाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवशी 884 पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी 553 उमेदवार उपस्थित राहिले, तर 247 उमेदवार गैरहजर होते. उपस्थित उमेदवारांपैकी 84 उमेदवार उंची आणि छातीच्या निकषांमध्ये अपात्र ठरले.
उर्वरित उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा तीन मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. भरती प्रक्रियेला पहाटे 5.30 वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली होती. उमेदवारांची सुरक्षितता, शिस्त आणि प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी सुमारे 400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भरती स्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
काटेकोर नियोजन, वेळेचे पालन आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. महाराष्ट्र पोलीस दलात भरतीची प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने राबविल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

