(राजापूर / तुषार पाचलकर)
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त पाचल गावात भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. संपूर्ण गाव भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते, तर “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
या शोभायात्रेत लेझीम आणि ढोल पथकांनी आकर्षक सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. ढोल-ताशांच्या गजरात तरुणांचा जोशपूर्ण सहभाग पाहायला मिळाला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातील विविध भागांतून नागरिक, युवक, महिला आणि बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत नववर्षाचे स्वागत केले. भगवे ध्वज, फुलांची उधळण आणि पारंपरिक पोशाखांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवी झाले होते.
ही शोभायात्रा स्वातंत्र्य सेनानी चौक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे महागणपती मंदिर येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम सेवक मंडळ आणि पाचल पंचक्रोशी नववर्ष स्वागत यात्रा समिती यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, पाचलमध्ये साजरा झालेला गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागत सोहळा एकात्मता, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरला. या शोभयात्रेत राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पो. कॉ. निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे यांसह सहकारी उपस्थित होते.

