(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुरधुंडा येथे उभारलेली संरक्षण भिंत आज भीषण स्थितीत असून ती कोसळण्याच्या स्थितीत आहे. ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते, जनतेच्या जीवाशी असा खेळ का? असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू असून, ठेकेदार यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावरील खड्डे, चिखल, पाण्याचे साचलेले तळे व चुकीचे डायव्हर्जन यामुळे अपघातांची मालिका थांबत नाही. ठेकेदार कंपनी कायम बेफिकीर राहिले असून, जनतेच्या संयमाची परीक्षा घेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी कुरधुंडा येथील दर्ग्याजवळ उभारलेली १०० मीटरहून अधिक लांबीची संरक्षण भिंत तडे जाऊन बाहेरच्या दिशेने झुकत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या धोकादायक स्थितीबद्दल बातम्या, व्हिडिओ व छायाचित्रांसह उघड झाल्यानंतरही प्रशासन वा ठेकेदार कंपनीकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट आज त्या भिंतीवरील तडे अधिक वाढले असून काही भाग जमिनीकडे झुकू लागला आहे.
या भिंतीच्या एका बाजूला महामार्गावरील वाहनांची अखंड रेलचेल तर दुसऱ्या बाजूला गाव व शेतजमिनींकडे जाणारा मार्ग असल्याने स्थानिक नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. “आधीच ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नाहक काहींचे जीव गेले आहेत; आणखी किती बळी घेण्याची प्रतीक्षा आहे?” असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
प्रशासन व ठेकेदार कंपनीने तातडीने या धोकादायक स्थितीची दखल घेऊन उपाययोजना न केल्यास होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागेल, असा इशारा जनतेतून दिला जात आहे.