(संगमेश्वर / दिनेश आंब्रे)
तालुक्यातील नावडी (ता. संगमेश्वर) येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी पत्रकार कै. प्रशांत (बाळू) कोकाटे आणि महेंद्र कोकाटे यांच्या मातोश्री विजया विश्वनाथ कोकाटे यांचे सोमवारी रात्री ९.५० वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
विजया कोकाटे या प्रेमळ, मनमिळाऊ आणि स्नेहशील स्वभावामुळे परिसरात सर्वपरिचित होत्या. त्यांच्या साध्या, संयमी आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नावडीसह परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन सुना, मुली, नातवंडे तसेच विस्तृत आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.
मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाने कोकाटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसराने एका प्रेमळ, कर्तृत्ववान आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

