(सिंधुदुर्ग)
दहावीची परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण सई संतोष सावंत हिच्यासाठी हा टप्पा आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. 18 मार्च रोजी शेवटचा पेपर असताना त्याच्या आदल्या दिवशीच तिच्या आईचं अचानक निधन झालं. घरात आईचा मृतदेह समोर असतानाही सईने मनावर दगड ठेवत परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
कणकवली तालुक्यात असलेल्या शिवडाव माध्यमिक विद्यालयातील सई ही एक अभ्यासू आणि जिद्दी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. 17 मार्च रोजी तिच्या आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सावंत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आईचा आधार हरपल्याने सई खचून जाणे स्वाभाविक होते, पण तिने स्वतःला सावरत आईचं स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग निवडला.
18 मार्च रोजी सकाळी घरात अंत्यविधीची तयारी सुरू असताना सईने हातात पेन आणि हॉलतिकीट घेतले आणि परीक्षा केंद्राकडे प्रस्थान केलं. मनात प्रचंड वेदना, डोळ्यांत अश्रू आणि आठवणींचा महापूर असतानाही ती ठामपणे परीक्षा हॉलमध्ये बसली. परीक्षा देताना सईच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते, पण तिचे हात थांबले नाहीत. प्रत्येक प्रश्न सोडवताना आईच्या आठवणीने तिचा गळा दाटून येत होता. तरीही तिने संयम राखत आपला शेवटचा पेपर पूर्ण केला.
या कठीण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तिला मोठे मानसिक बळ दिले. शाळेच्या वतीने तिला परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा झाल्यावर घरी पोहोचवण्यासाठी मदत करण्यात आली. तिच्या धैर्याने सर्व शिक्षक आणि उपस्थित विद्यार्थीही भावूक झाले.
पेपर संपवून सई जेव्हा बाहेर आली, तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. परीक्षा पूर्ण करताच ती थेट आईच्या अंत्यविधीसाठी घरी रवाना झाली. सईने दाखवलेले हे धैर्य आणि जिद्द केवळ तिच्या आईच्या स्वप्नासाठीच नव्हे, तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशा कठीण प्रसंगातही आपले दुःख बाजूला सारून शिक्षणाला प्राधान्य देणारा तिने घेतलेला निर्णय समाजाला अंतर्मुख करून गेला.

