(पुणे/कोल्हापूर)
राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ जूनपासून महाराष्ट्रातील सर्व एसटी बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोल्हापूर दौऱ्यावर असताना सरनाईक यांनी मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या भेटीमुळे स्थानक प्रशासनात एकच खळबळ उडाली.
स्वच्छतागृहांची तपासणी करताना त्यांनी स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले, मात्र “आज मी येणार आहे म्हणूनच ही स्वच्छता केली आहे का?” असा थेट सवाल करत कंत्राटदारांना सुनावले. अनेक ठिकाणी प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
कॅन्टीन दरांवरही लक्ष
स्वच्छतागृहांबरोबरच मंत्र्यांनी बस स्थानकावरील कॅन्टीनचीही पाहणी केली. दर फलकाची तपासणी करत प्रवाशांकडून खाद्यपदार्थांच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रवाशांना मोठा दिलासा
राज्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर प्रवाशांना मूलभूत सुविधा सन्मानाने आणि विनामूल्य मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. १ जूनपासून मोफत स्वच्छतागृह सुविधा लागू झाल्यानंतर दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना थेट फायदा होणार आहे. या निर्णयामुळे एसटी प्रवास अधिक सोयीस्कर आणि प्रवासीहिताचा होणार असल्याचे मानले जात आहे.

