(पुणे)
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येरवडा ते कात्रज या महत्त्वाकांक्षी भूमिगत बोगदा प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पूर्ण झाला असून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एकूण 56 भुयारी बोगदे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
आता कात्रजचा घाट नव्हे, तर कात्रजचा बोगदा चर्चेत येणार असून, पुण्यातील रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक थेट जमिनीखाली वळवली जाणार आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील कोंडी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. “काही ठिकाणी बिनडोकपणे पुलांची उभारणी झाली आहे. त्यामुळे आता नियोजनबद्ध पद्धतीने एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहेत. खाली रस्ता, त्यावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि वर मेट्रो अशी रचना असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एका अभ्यास अहवालानुसार पुण्यातील अवघ्या 32 प्रमुख रस्त्यांवर शहरातील बहुतांश वाहतूक चालते. या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा दीडपट ते अडीचपट वाहतूक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या 32 रस्त्यांचे डी-कन्जेशन करण्यात येणार असून, शहरात 23 उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. यापैकी 8 उड्डाणपुलांचे काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या योजनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे पुण्यात ‘पाताळ लोक’ म्हणून ओळखले जाणारे भुयारी रस्ते. शहरात एकूण 56 भूमिगत बोगदे उभारले जाणार असून, यामध्ये येरवडा–कात्रज, औंध–संगमवाडी अशा प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे 32 हजार कोटी रुपये असून, त्याचे डिझाइनही अंतिम करण्यात आले आहे.
येरवडा–कात्रज बोगद्याचे महत्त्व
येरवडा ते कात्रज हा बोगदा पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणारा प्रमुख दुवा ठरणार आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक भूमिगत मार्गावर वळवली जाईल. हा केवळ एक बोगदा नसून, सुमारे 54 किलोमीटर लांबीचे भूमिगत जाळे असेल, जे जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी यांसारख्या प्रमुख भागांना जोडेल.
हे भूमिगत मार्ग पुण्याच्या रिंग रोडशी जोडले जाणार असून, त्यामुळे शहरातून महामार्गाकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होईल. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सुमारे 40 टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
येरवडा–कात्रज भूमिगत बोगदा आणि एकूण 56 बोगद्यांचा हा महाप्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

