(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून चिरे टाकून अडविण्यात आल्याच्या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी रत्नागिरी तालुक्याच्या वतीने बुधवारी ( १८ मार्च ) जिल्हा पोलीस अप्पर पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
सादर केलेल्या निवेदनानुसार, १६ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास निवळी बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रहदारीचा रस्ता अज्ञात व्यक्तीने मोठे चिरे टाकून बंद केला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांची ये-जा विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून रस्ता मोकळा केला आणि संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल, असे ग्रामस्थांना आश्वासन दिले. मात्र निवळी बौद्धवाडीत यापूर्वीही अशाच प्रकारे सार्वजनिक मार्ग अडविण्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याने पुन्हा हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ किरकोळ स्वरूपात न पाहता सार्वजनिक हक्कांवर गदा आणणारा गंभीर प्रकार म्हणून पाहावे, अशी भूमिका आंबेडकरी पक्षांनी घेतली आहे.
त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक रस्ते अडवून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन हालचालींमध्ये अडथळा निर्माण करणे हे कायद्याच्या दृष्टीने गंभीर असून, अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, तसेच यापूर्वी घडलेल्या घटनांचाही फेरआढावा घेऊन जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी यांना देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, महासचिव बिपिन आयरे, उपाध्यक्ष वैभव यादव, सल्लागार अजित जाधव, बहुजन समाज पार्टी शहराध्यक्ष रुपेश कांबळे आदीउपस्थित होते.
सत्य समोर आणून दोषींवर ठोस कारवाई करणे आवश्यक
“सार्वजनिक रस्ता अडविण्यासारखे धाडसी कृत्य करणाऱ्यांच्या मनातून प्रशासनाचा धाक उरलेला नाही, अशी चिंताजनक परिस्थिती आज तालुक्यात अनेक ठिकाणी जाणवत आहे. कायद्याचा सन्मान आणि प्रशासनाची भीती कमी होत चालल्याचे हे लक्षण मानावे लागेल. त्यामुळे अत्यंत गांभीर्याने पोलिसांनी लक्ष द्यावे. घटना घडून इतके दिवस उलटून गेल्यानंतरही साधा रस्ता नेमका कोणी अडविला, याचा शोध जर पोलिस यंत्रणेला लागलेला नसेल, तर स्वाभाविकच नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तपासाची गती मंदावल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही संशय व्यक्त होऊ शकतो. म्हणूनच या प्रकरणात तातडीने सत्य समोर आणून दोषींवर ठोस कारवाई करणे आता आवश्यक आहे.
– मुकुंद सावंत, (वंचित, जिल्हा मा. महासचिव)

