(कोल्हापूर)
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थितीची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पंचगंगा नदीचे पाणी रविवारी पात्राबाहेर आले असून, नदीची पाणीपातळी अवघ्या 24 तासांत तब्बल 10 फुटांहून अधिक वाढली आहे. रविवारी मध्यरात्री पंचगंगा नदीची पाणीपातळी 31 फूट 9 इंचांवर पोहोचली. वाढत्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेले असून, 7 महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने सोमवारी (6 जुलै) कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
रविवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 30 फूट 8 इंच होती. रात्रीपर्यंत ती 31 फूट 9 इंचांवर पोहोचली. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. सध्या नदी धोक्याच्या पातळीपासून दूर असली तरी पाणी वाढण्याचा वेग प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पंचगंगेची उपनदी असलेल्या कासारी नदीनेही पात्र सोडले असून, नदीकाठची अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
39 बंधारे जलमय, 7 रस्त्यांवरील वाहतूक बंद
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 299 बंधाऱ्यांपैकी 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ हे प्रमुख बंधारे जलमय झाले आहेत. याशिवाय दोन राज्य महामार्ग आणि पाच जिल्हा व ग्रामीण मार्गांसह एकूण सात रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण 100 टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. राधानगरी धरणात 32 टक्के, तर तुळशी धरणात 38 टक्के पाणीसाठा झाला आहे. दूधगंगा आणि वारणा धरणांतून प्रत्येकी 100 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहरात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असल्याने गांधी मैदान, दुधाळी मैदानासह अनेक सखल भागांत पाणी साचले. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि विविध पेठांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या 24 तासांत शहरात 44 मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पंचगंगा नदी पात्राबाहेर आल्याने नदीची वाढलेली पाणीपातळी पाहण्यासाठी पंचगंगा घाट आणि रंकाळा परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. रंकाळा तलावाच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
शिवाजी पुलावर वाहतूक कोंडी
पावसामुळे मोठ्या प्रमाणात खेकडे आणि मासे विक्रीसाठी बाजारात आल्याने शिवाजी पुलाजवळ खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे दिवसभर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे महाद्वार रोडवर नेहमीच्या तुलनेत कमी गर्दी दिसून आली.
NDRF तैनात, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
पुढील तीन दिवस घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, NDRF ची एक तुकडी कोल्हापुरात दाखल झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

