( मुंबई )
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या Maharashtra State Road Transport Corporation (एसटी) महामंडळात लवकरच मोठी भरती होणार आहे. एसटीमध्ये एकूण 17,742 रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. चालक, वाहक तसेच इतर विविध पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे.
विधान परिषदेत मुद्दा उपस्थित
एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. या चर्चेत अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनीही सहभाग घेतला. चर्चेदरम्यान काही सदस्यांनी एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली.
2022 च्या संपानंतर कंत्राटी भरती
2022 साली एसटी महामंडळाचा मोठा संप झाला होता. त्या काळात राज्यभर बससेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 1 फेब्रुवारी 2022 रोजी निविदा प्रक्रियेद्वारे तात्पुरती कंत्राटी भरती करण्यात आली होती. संपाच्या काळात सुमारे 12,500 बसेस सेवेत होत्या, तर सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे 14,000 बसेस आहेत.
दरवर्षी 5 हजार नवीन बस खरेदीचा निर्णय
महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5 हजार नवीन बस खरेदी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत 8 हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी 3 हजार बसचे वितरण सुरू झाले आहे. बसची संख्या वाढत असल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
भरतीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य
सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर एसटीतील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. त्या वेळी सध्या काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

