(मुंबई)
कोकणातील प्रवाशांसाठी मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई–कोकण मार्गावरील महत्त्वाची दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करून त्याच स्लॉटवर आता दादर–गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या पत्रातून या निर्णयाला दुजोरा मिळाला आहे. विशेष गाडी क्रमांक 01027/01028 ला नियमित दर्जा देत ती आता 11047/11048 दादर–गोरखपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे.
या निर्णयामुळे कोकणातील प्रवासी, विशेषतः मुंबईत काम करणारा चाकरमानी वर्ग अडचणीत सापडणार आहे. दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि परवडणारी सेवा होती. ती बंद झाल्याने प्रवास खर्च वाढण्याची आणि पर्यायी गाड्यांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. कोरोनापूर्वी नियमित धावणारी ही पॅसेंजर सेवा ‘झिरो टाइमटेबल’ दरम्यान दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली होती. त्यानंतर प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनही ही सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. या निर्णयाविरोधात प्रवासी संघटनांकडून अनेकदा आंदोलने करण्यात आली, तसेच मध्य रेल्वेला निवेदने देण्यात आली होती. स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण रेल्वेकडून दिले जात होते. मात्र त्याच स्लॉटवर दादर–गोरखपूर विशेष गाडी चालवण्यात आल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. यासाठी आंदोलने आणि मोर्चेही काढण्यात आले होते.
मुंबई, उपनगर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी दरवर्षी कोकणात प्रवास करतात. विशेषतः पश्चिम रेल्वेच्या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांसाठी कोकणात जाण्याचा सर्वात सोयीचा आणि परवडणारा पर्याय म्हणजे दादर–रत्नागिरी पॅसेंजर होता. गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी आणि होळी यांसारख्या सणांसाठी हजारो कुटुंबे या गाडीवर अवलंबून असतात. मात्र आता या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. दादर–रत्नागिरी पॅसेंजरच्या स्लॉटवर दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीचा महत्त्वाचा पर्याय संपुष्टात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने ऑपरेशनल कारणांचा दाखला देत हा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये असंतोष वाढत असून, “हक्काची गाडी हिरावली” अशी भावना व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, येत्या काळात प्रवासी संघटनांचा विरोध आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

