(मुंबई)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षन्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. 29 महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेना (शिंदे) गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या कार्यक्रमात दोघांमध्ये कोणताही तणाव दिसून आला नाही. उलट, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी, त्यांचा वैचारिक परखडपणा आणि आजच्या राजकारणावर दोघांनीही स्पष्ट भूमिका मांडली.
“पक्ष सोडणं नव्हे, घर सोडणं होतं” – राज ठाकरे
कार्यक्रमातून लवकर निघायचे असल्याने राज ठाकरे यांनी सर्वप्रथम भाषण केले. शिवसेना सोडतानाच्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा ते पक्ष सोडणं नव्हतं; माझ्यासाठी ते घर सोडणं होतं.” या घटनेला आता वीस वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत, “या काळात मला अनेक गोष्टी उमजल्या, उद्धवलाही उमजल्या असतील. ते आता सोडून द्या,” असे सूचक विधान त्यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगताना राज ठाकरे म्हणाले की, बाहेर आंदोलनं, मोर्चे सुरू असले तरी बाळासाहेब व्यंगचित्र काढताना पूर्ण एकाग्र असायचे. बाहेरच्या गोंधळाचा त्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होत नसे.
“आजचं राजकारण पाहून शिसारी येते”
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जे सुरू आहे ते पाहून शिसारी येते. आज हे सगळं पाहायला बाळासाहेब नाहीत, तेच बरं.” महाराष्ट्रातील राजकारणाला त्यांनी “गुलामांचा बाजार” अशी उपमा दिली.
कलानगरमधील एका प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्याशी संवादात बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले होते, “या देशात मी हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावेन.” आज हिंदूंच्या नावावर सुरू असलेला राजकीय व्यवहार बाळासाहेबांना कधीच मान्य नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ठाकरे नाव पुसणं शक्य नाही” – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा वारसा अधोरेखित केला. “आम्ही वादळात खेळत मोठे झालो आहोत. त्यामुळे वादळाशी कसं लढायचं, हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला.
लहानपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “शाळेत जायचं नसेल तेव्हा मी बाळासाहेबांना मिठी मारायचो. ते म्हणायचे, ‘एक दिवस शाळेत नाही गेलास तर काय फरक पडतो?’” परिस्थितीमुळे बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांना लवकर शिक्षण सोडावे लागले, मात्र त्यांनी उभे केलेले विचारविश्व आजही जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे आडनाव पुसण्याच्या प्रयत्नांवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज अनेकजण ठाकरे नाव पुसायला निघाले आहेत, पण ते शक्य नाही.” गद्दारीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विजय अनिश्चित असताना शत्रू गद्दारांची मदत घेतो. “मतं विकत घेता येतील, पण शिवसेनेचा विचार असलेल्या मतदाराचं मन विकत घेता येणार नाही,” असेही ते म्हणाले.
आपल्याला गद्दारीचा शाप लागलेला आहे. गद्दारी आपल्याला नवी नाही. मेलो तरी बेहत्तर पण, गुलामीत जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकवलं, आणि जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी आपण गुलामगिरीमध्ये राहत होतो, तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मी मेलो तरी बेहत्तर पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्य जगणार नाही, अशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला आहे. मत विकत घ्याल पण, मन कसं विकत घ्याल? असा सवाल त्यांनी विचारलं.
नाराज कार्यकर्त्यांना समेटाचा संदेश
महापालिका निवडणुकांनंतर पक्षातील नाराजीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी समेटाचा सूर लावला. “जिथे तीन-चार इच्छुक असतात, तिथे एकालाच उमेदवारी द्यावी लागते. एक दिवस नाराज होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणं, यालाच निष्ठा म्हणतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. “काही पानं झडली तरच झाडाला नवी पालवी फुटते,” असे सांगत पक्ष पुन्हा मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत यांचीही उपस्थिती होती.

