(मुंबई)
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना मोठा धक्का बसला आहे. 2016 मधील वाकोला येथील उर्दू शाळा प्रकरणात दोषमुक्ती मिळावी यासाठी दाखल केलेली त्यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून आरोपींविरोधात खटला चालवण्यास पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
29 जुलै 2016 रोजी वाकोला परिसरातील पालिकेच्या उर्दू शाळेत हा प्रकार घडला होता. त्या वेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा असलेल्या रितू तावडे या काही कार्यकर्त्यांसह शाळेत गेल्या होत्या. एका महिला शिक्षिकेची बदली केल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या होत्या. संबंधित शिक्षिका कर्करोगाने आजारी असल्याने तिच्या बदलीचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. या दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत त्यांची वादावादी झाली. हा वाद पुढे वाढत जाऊन धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. त्यावेळी दोन शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप रितू तावडे यांच्यावर करण्यात आला आहे. यावेळेस संतापलेल्या रितू तावडेंनी उर्दू शाळेत शिवकणाऱ्या दोन शिक्षकांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप शाळेकडून करण्यात आला. सदर प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शरीफा मोमिन यांनी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑगस्ट 2016 रोजी एफआयआर दाखल केला. पोलिसांनी सार्वजनिक सेवेतील कर्मचाऱ्यांना मारहाण करुन कामात अडथळा आणल्या प्रकरणी आयपीसी 353, 323, 341 यासारख्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.
कोणते गुन्हे दाखल?
या प्रकरणी मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून रितू तावडे आणि इतरांवर पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला: IPC कलम 353 – सरकारी कामात अडथळा, IPC कलम 332 – दुखापत करणे, IPC कलम 504 – शांतता भंग करणे
कोर्टाने काय म्हटले?
रितू तावडे यांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने दाखल झाल्याचा दावा करत दोषमुक्तीची मागणी केली होती. मात्र, पोलिसांचे आरोपपत्र, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब लक्षात घेता या टप्प्यावर दोषमुक्ती देणे शक्य नसल्याचे सत्र न्यायालयाने नमूद केले. या निर्णयानंतर आता या प्रकरणात खटला सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या निकालाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय रितू तावडे यांच्यासमोर खुला आहे.
या प्रकरणामुळे आधीच महागडं घड्याळ, त्यानंतर गाडीवरचा लाल दिवा अशा विविध वादांमध्ये अडकलेल्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून याचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

