(नवी दिल्ली)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यामुळे सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर लष्करातील अधिकारी आणि जवानांना तातडीने ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. मेजर विक्रम गुप्ता यांनाही ड्युटीवर परतण्याचा आदेश मिळाल्यानंतर ते पत्नी वैशाली आणि तीन वर्षांची मुलगी रिहानासह घरातून निघाले. मात्र, दिल्ली-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला असून, रिहाना गंभीररित्या जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई महामार्गावरील नौगंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्व्हर्ट क्रमांक ८२ जवळ मेजर विक्रम यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला आदळली. दरवाजा उघडताच वैशाली आणि रिहाना रस्त्यावर फेकल्या गेल्या. या दोघींना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना अलवर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी वैशाली यांना मृत घोषित केले, तर रिहानाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मेजर विक्रम गुप्ता हे दिल्लीत दिलशाद गार्डन परिसरात राहतात. सुट्टीच्या काळात पत्नी आणि मुलीसह कोटा येथे नातेवाईकांच्या भेटीस गेले होते. मात्र, देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुट्टी रद्द झाल्यामुळे ते दिल्लीत परतत होते. त्यांचा हेतू पत्नी आणि मुलीला घरी सोडून ड्युटीवर हजर होण्याचा होता. मात्र, या प्रवासात घडलेला अपघात त्यांच्या आयुष्यात दुःखद वळण घेऊन आला.