(तिरुपती/नवी मुंबई)
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) कडून नवी मुंबईत भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी (तिरुपती बालाजी) यांचे भव्य मंदिर उभारले जात असून या प्रकल्पाला अधिक वैभवशाली स्वरूप देण्यासाठी मंदिरातील मुख्य देवतेसाठी सुवर्ण कवच तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तिरुमलामध्ये पार पडलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबईतील उलवे भागात उभारल्या जाणाऱ्या या मंदिरात मुख्य गाभाऱ्यातील देवतेसह उपमंदिरांतील मूर्तींसाठीही सोन्याचा मुलामा असलेले तांब्याचे कवच तयार केले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 5.12 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यामध्ये सुमारे 4.90 कोटी रुपये साहित्यावर आणि 22 लाख रुपये मजुरीवर खर्च होणार आहेत.
या योजनेअंतर्गत तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कोषागारातून सुमारे 3 किलो 24 कॅरेट सोनं वापरण्यात येणार आहे, तर मंदिराच्या दागिन्यांच्या विभागातून 125 किलो तांब्याचे पत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या माध्यमातून तिरुमलाबाहेरील मंदिरांमध्येही भगवान व्यंकटेश्वर यांच्या पूजेची परंपरा, पावित्र्य आणि भव्यता जपण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तिरुमला परिसरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवरही TTDने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्लास्टिक, टेट्रा पॅक्स आणि धातूच्या कॅन्समुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी हैदराबादस्थित ‘Recycle’ संस्थेच्या सहकार्याने रिव्हर्स वेंडिंग मशीन्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुमलातील 28 ठिकाणांवरील सुमारे 50 केंद्रांवर ही मशीन्स बसवली जाणार असून ‘डिपॉझिट रिटर्न’ योजनेअंतर्गत भाविकांना वापरलेले कॅन्स आणि पुठ्ठ्याचे खोके जमा केल्यास परतावा मिळणार आहे.
या उपक्रमामुळे कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन मिळेल आणि तिरुमला परिसरातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. एकीकडे नवी मुंबईत भव्य मंदिर उभारण्याचा प्रकल्प आणि दुसरीकडे पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचे निर्णय यामुळे TTD परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा समतोल राखत पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

