(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जागतिक स्तरावरील युद्धजन्य घडामोडींमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ लागल्याने एलपीजी गॅस उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील ज्या भागांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणीचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागांतील नागरिकांना तातडीने पुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पुढाकारातून वेगाने सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आणि पालकमंत्री सामंत यांच्या निर्देशानुसार महानगर गॅस लिमिटेड कंपनीने शहरात प्रत्यक्ष पुरवठा प्रारंभ केला आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून रत्नागिरी जिल्ह्यात पीएनजी आणि सीएनजी वितरणासाठी अधिकृत परवाना देण्यात आल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर जाळे उभारण्यात आले. आतापर्यंत सुमारे २० हजार जोडण्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी सुमारे १० हजार जोडण्या प्रत्यक्ष सक्रिय अवस्थेत आहेत. तर साडेचार हजार जोडण्या सोसायट्यांच्या परवानग्या, तांत्रिक मंजुरी आणि अन्य प्रक्रियांमुळे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
या जोडण्यांमध्ये निवासी ग्राहकांसह व्यावसायिक आस्थापना, मोठी हॉटेल्स आणि सेवा व्यवसायांचाही समावेश आहे. पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि तुलनेने किफायतशीर पर्याय म्हणून पीएनजीकडे पाहिले जात असल्याने केंद्र सरकारकडूनही त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात काही भागांत गैरसमज आणि स्थानिक पातळीवरील विरोधामुळे जोडणी पूर्ण असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू होण्यास विलंब झाला होता. आता मात्र एलपीजी पुरवठ्यावर दबाव वाढल्याने प्रशासनाने पीएनजीला पर्यायी उपाय म्हणून प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पुरवठा गतीमान करण्याचे निर्देश दिले. नोंदणीकृत घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
यासंदर्भात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनीही प्रलंबित जोडण्या तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्यानंतर रविवारीपासून प्रत्यक्ष पुरवठा सुरू करण्याची मोहीम राबविण्यात आली. सध्या दररोज १० ते १५ ग्राहकांना पुरवठा सुरू केला जात असून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे हे काम सुरू आहे. मागणीचा वाढता कल लक्षात घेता कंपनीकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील अधिक भागांमध्ये तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या केंद्रांमध्येही पीएनजी सेवा गतीमान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

