(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या शांतीनगर परिसरात भरदुपारी झालेल्या सलग तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, संशयित चोरटे आलिशान कारमधून परिसरात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर बसस्टॉपलगत असलेल्या एका निवासी इमारतीवर चोरट्यांनी प्रथम डल्ला मारला. अत्यंत शिताफीने त्यांनी बंद असलेल्या सदनिकेच्या शेजारील फ्लॅट्सना बाहेरून कड्या लावून रहिवाशांची हालचाल रोखली. त्यानंतर लक्ष्य केलेल्या सदनिकेची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून रोख रक्कम आणि दागिने लंपास करून चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. घरमालक घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, याच टोळीने शांतीनगर-रसाळवाडी तसेच सावंतनगर परिसरातील आणखी दोन घरांमध्येही घरफोडी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे परिसरात एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घटनांची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी मोठ्या रकमेचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयितांची हालचाल कैद झाली आहे. फुटेजमध्ये काही जण आलिशान कारमधून येताना आणि परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसत असल्याचे समजते. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
भरदिवसा, लोकवस्तीच्या परिसरात आणि सलग तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने शांतीनगर, रसाळवाडी आणि सावंतनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी वापरलेली पद्धत आणि त्यांचा आत्मविश्वास पाहता ही एखाद्या सराईत टोळीची कारवाई असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी सुरू असून, लवकरच या घरफोडी प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

