(त्नागिरी)
शहरातील राधाकृष्ण नगर परिसरात एका तरुणाच्या भाडेघराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ११.३५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
जितेंद्र संजय पाटील (वय २४, रा. वाडी बिके, ता. शिरपूर, जि. धुळे, सध्या रा. ए-लतिफ बिल्डींग, दुर्गा मातेजवळ, राधाकृष्ण नगर, रत्नागिरी) हे श्री. तांबेकर यांच्याकडे भाड्याने राहत आहेत. सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले असता, त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या दरम्यान चोरट्याने त्यांच्या खोलीतील दोन बॅगमधून रोख १,५०० रुपये आणि ‘वन प्लस नॉर्ड सीई ४ डार्क क्रोम’ कंपनीचे दोन स्मार्टफोन (प्रत्येकी किंमत १५,००० रुपये) असा एकूण ३१,५०० रुपयांचा ऐवज लांबवला.
घटनेनंतर फिर्यादीने आपल्या कंपनीला माहिती दिल्यानंतर उशिरा तक्रार दाखल केली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(अ) व ३३१(३) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

