(रत्नागिरी)
नारायणमळी, कांदळवन नाचणे येथे भारतात पहिल्यांदाच प्रायोगित तत्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘स्वॅम्प पोलीस’ (Swamp Police) गस्त उपक्रमाचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हवेत फुगे सोडून करण्यात आले.*
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, एनएसजी कमांडर गुरुविंदरसिंग, जि.प. सदस्य प्रकाश रसाळ, सरंपच भैया भोंगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, देशातले पहिले केंद्र पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांच्या नेतृत्चाखाली सुरु होत आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. भविष्यात अशाप्रकारचे उपक्रम पर्यटनाच्या, रत्नागिरीच्या संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक करतील, त्याला आपले पूर्ण सहकार्य असेल.
जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन (मँग्रोव्हज) आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. यावर उपाय म्हणून आता कायक बोट (Kayak Boat) माध्यमातून ही गस्त घातली जाणार आहे. दलदलीच्या भागात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास ‘स्वॅम्प पोलीस’ अत्यंत वेगाने प्रतिसाद देऊ शकतील. भविष्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

