(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याच अनुषंगाने आज राजापूर तालुक्यातील पाचल येथील आठवडा बाजार परिसरात मद्यधुंद वाहनचालकांवर विशेष कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच राजापूर तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यावेळी राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी वाहनांची तपासणी करत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस दाखल केल्या.
सध्या मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांमुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा निष्काळजीपणामुळे निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असून, अशा घटनांना आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हाभर विशेष मोहीम सुरू केली आहे.
पाचल येथील आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये कार्यरत होते. त्यामुळे संशयित वाहनचालकांवर प्रभावीपणे नजर ठेवणे पोलिसांना शक्य झाले.
या मोहिमेत राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक कमलाकर पाटील, राजापूर पोलीस गोपनीय विभागाचे नरेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, रामदास पाटील, स्वप्नील घाटगे आणि संग्राम नरुटे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

