(मुंबई)
साकीनाका परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात कार चालवणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात १५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता नहार अमृत शक्ती रोडवरील मंगोलिया बिल्डिंग गेट क्रमांक २ जवळ घडला. दुबईहून ईदच्या निमित्ताने मुंबईत आलेला अल्पवयीन मुलगा एर्टिगा कार भरधाव वेगात चालवत होता. त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन भावांना जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला प्रतीक माने (१५) गंभीर जखमी झाला. त्याचा मोठा भाऊ सुमित माने दुचाकी चालवत होता. दोघेही रस्त्यावर पडल्याने प्रतीकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. सुमितच्या पायाला दुखापत झाली आहे.
प्रतीक हा दहावीचा विद्यार्थी होता. त्याची ६ एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार होती. मूळ गावी लग्न असल्याने प्रवासासाठी खरेदी करण्यासाठी दोन्ही भाऊ बाहेर पडले होते. मात्र नाहर जंक्शनजवळ कारने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ताब्यात
अपघातानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अल्पवयीन चालकाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर प्रकरण कोर्टसमोर सादर करण्यात आले. बोर्डाने त्याला २७ मार्चपर्यंत डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मित्रावरही गुन्हा
या प्रकरणात कार चालकाचा मित्र आणि एमबीबीएसचा विद्यार्थी मोहम्मद अनस मोहर्रमअल्ली खान याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार भाड्याने घेऊन ती अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीनांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

