(मुंबई)
मुंबईच्या वेगवान जीवनशैलीने पुन्हा एकदा एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंधेरी (पूर्व) येथून माटुंगा येथे पत्नी आणि आपल्या तीन महिन्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या 24 वर्षीय नीलकंठ इंगोले यांचा भीषण ‘हिट अँड रन’ अपघातात मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घडली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भरधाव वाहनाची जोरदार धडक, जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नीलकंठ इंगोले हा अंधेरी पूर्व येथील टोपलीवाडी चाळीत राहणारा कुटुंबाचा आधार होता. 24 मार्च रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता तो दुचाकीने माटुंगाकडे निघाला होता. रात्री अंदाजे 12.15 वाजता तो विलेपार्ले पूर्व येथील सेंटॉर ब्रिजच्या उतारावर पोहोचला असता, मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नीलकंठ दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर जखमी तरुणाला मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती, तर कदाचित नीलकंठचा जीव वाचला असता, अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.
नीलकंठने दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याला मुलगा झाला होता. पत्नी सध्या माहेरी राहत असल्याने तो वारंवार त्यांना भेटण्यासाठी जात असे. मात्र, या अपघातामुळे त्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले आहे.
विलेपार्ले पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हायवेवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

