(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून, ती कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. पुढील आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास घटनात्मक मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनानुसार, सन १९८६ मध्ये सुरू झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या चार दशकांत कोणतीही मोठी दुरुस्ती झालेली नाही. परिणामी इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असून, छताचा स्लॅब आणि आधारस्तंभ कमकुवत झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असून, छपराचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे विद्युत यंत्रणेत पाणी शिरत असल्याने गेल्या दोन वर्षांत कर्मचाऱ्यांना विजेचे धक्के बसल्याच्या घटनाही घडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा सुरू ठेवणे धोकादायक ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, परिसरात औद्योगिक विकास वेगाने होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या आरोग्य केंद्रात दररोज सुमारे १५० हून अधिक बाह्यरुग्ण (ओपीडी), १० हून अधिक आंतररुग्ण (आयपीडी) उपचारासाठी येतात, तर महिन्याला नऊहून अधिक प्रसूती येथे होत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वाढत्या रुग्णभाराच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या दोन डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने अनियमित वेतनामुळे राजीनामा दिला असून, अनेक कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. याशिवाय औद्योगिक क्षेत्र असूनही एक्स-रे, सोनोग्राफी यांसारख्या अत्यावश्यक निदान सुविधा उपलब्ध नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेचीही उपलब्धता नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेने प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. धोकादायक इमारतीमधून प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने सुरक्षित इमारतीत स्थलांतर करण्यात यावे आणि नव्या इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करावे. तसेच वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय उपकरणे व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून आरोग्य केंद्र सक्षम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून आठ दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांना घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा स्पष्ट इशारा प्रथमेश गावणकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

