(लांजा/ रत्नागिरी प्रतिनिधी)
भाकर सेवा संस्था आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘आजी-आजोबांचा गाव’ येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. खेळकर, आनंदी आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाने ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
कै. अरुणाताई पाटील व श्री. देवेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘आजी-आजोबांचे गाव’ हे स्वप्न 21 ऑगस्ट 2021 रोजी प्रत्यक्षात उतरले. गेल्या चार वर्षांपासून कोंड्ये येथे भाकर सेवा संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये निराधार व गरजू ज्येष्ठांसाठी राहण्याची, जेवणाची, मनोरंजनाची तसेच वैद्यकीय सुविधांची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती वातावरण, प्रेमळ देखरेख आणि आपुलकीची उब या माध्यमातून आजी-आजोबांना आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा मिळते.
कार्यक्रमाची सुरुवात सनोफी पिरॅमल स्वास्थ्य संस्थेच्या वैद्यकीय शिबिराने झाली. शिबिरात सर्व ज्येष्ठ नागरिकांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर विविध मनोरंजनात्मक खेळ—गरबा, संगीत खुर्ची, पिलो पासिंग, स्लो वॉक आणि बॉल टाकण्याचे स्पर्धा—यांनी वातावरण रंगले. काही आजींनी गाणी सादर करून रंगत वाढवली. महिला पुनर्वसन केंद्रातील महिलांनीही सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचा विशेष ठळक भाग म्हणजे देहदान व अवयवदानाचा संकल्प. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे श्री. रेशम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यकर्त्यांसह 12 जणांनी देहदानाचे फॉर्म भरून समाजाप्रती एक मोठी बांधिलकी जपली. कार्यक्रमादरम्यान सर्व ज्येष्ठांना फळांचे वाटप करण्यात आले. समाजसेवक श्री. युयुत्सु आर्ते, भाकर सेवा संस्थेचे संचालक पवनकुमार मोरे, सचिव अश्विनी मोरे, संस्थापक देवेंद्र पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भाकर सेवा संस्थेचे फ्रंटलाईन वॉरियर्स व दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रमोद हर्डीकर यांचीही उपस्थिती होती.
रत्नागिरीचे समाजकल्याण अधिकारी मा. श्री. दीपक घाटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ज्येष्ठांशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला ‘आजी-आजोबांच्या गावातील’ रहिवासी तसेच कोंड्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

