(संगमेश्वर / एजाज पटेल)
आजचे जग ‘युज अँड थ्रो’ म्हणजेच वापरा आणि फेका या संस्कृतीकडे झुकत असताना अनेक पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. मात्र, या बदलत्या जीवनशैलीतही पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा गजबजून जाणारा व्यवसाय म्हणजे छत्री दुरुस्ती. स्वस्त चिनी छत्र्यांनी बाजारपेठ व्यापली असली, तरी दर्जेदार आणि महागड्या छत्र्या दुरुस्त करून पुन्हा वापरणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे.
काही वर्षांपूर्वी पावसाळा सुरू झाला की गावोगावी छत्री दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांचे स्टॉल दिसायचे. आज त्यांची संख्या कमी झाली असली, तरी या व्यवसायाचे महत्त्व अजूनही कायम आहे. बाजारात ५० ते १०० रुपयांत मिळणाऱ्या स्वस्त छत्र्या खराब झाल्या की त्या फेकून देण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मात्र, महागड्या, ब्रँडेड, थ्री-फोल्ड किंवा ऑटोमॅटिक छत्र्या खराब झाल्यास ग्राहक त्या दुरुस्त करून घेण्यालाच प्राधान्य देतात.
आधुनिक छत्र्यांची रचना अधिक गुंतागुंतीची असल्याने त्यातील स्प्रिंग, लॉक, बटन किंवा काड्या दुरुस्त करण्यासाठी अनुभवी कारागिरांची गरज भासते. जुन्या छत्र्यांचे सुटे भाग सहज उपलब्ध होत नसले, तरी हे कारागीर जुन्या भागांचा वापर करून छत्री पुन्हा वापरण्यायोग्य बनवतात. त्यामुळे त्यांचे कौशल्य आजही तितकेच महत्त्वाचे मानले जाते.
छत्री दुरुस्ती व्यवसायातील अनुभवी कारागीर सुभाष चव्हाण सांगतात, “आज बाजारात मिळणाऱ्या स्वस्त छत्र्या एका जोरदार वाऱ्यात उलटतात आणि थेट कचऱ्यात जातात. मात्र, लोक त्यांच्या जुन्या दर्जेदार किंवा ब्रँडेड छत्र्या सहजासहजी टाकून देत नाहीत. काही छत्र्यांशी आठवणी जोडलेल्या असतात, तर काही अनेक वर्षांपासून घरात वापरल्या जात असतात. अशा छत्र्या दुरुस्त करून घेण्यासाठी आजही ग्राहक आमच्याकडे येतात. कमी खर्चात आवडती छत्री पुन्हा वापरण्यायोग्य झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. हा व्यवसाय हंगामी असला, तरी प्रामाणिकपणे काम केल्यास त्यातून सन्मानाने उदरनिर्वाह होतो.”
पावसाळ्यातील तीन ते चार महिने या कारागिरांसाठी सर्वाधिक व्यस्त असतात. छत्री दुरुस्तीचा खर्च साधारण ५० रुपये पासून येतो, जो नवीन दर्जेदार छत्री खरेदी करण्यापेक्षा अनेकांना परवडणारा ठरतो.
‘युज अँड थ्रो’ संस्कृतीमुळे वाढणारा प्लास्टिक कचरा आणि पर्यावरणावरील ताण लक्षात घेता, वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरण्याची सवय अधिक महत्त्वाची ठरत आहे. छत्री दुरुस्ती करणारे कारागीर केवळ आपला पारंपरिक व्यवसाय जपत नाहीत, तर पुनर्वापराला चालना देऊन पर्यावरण संवर्धनातही मोलाचे योगदान देत आहेत. मॉल संस्कृती आणि ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रभावातही पावसाच्या पहिल्या सरींसोबत सुरू होणारी ही छोटी दुकाने आजही समाजाच्या गरजेचा अविभाज्य भाग असल्याचे चित्र दिसून येते.

