(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील निरबाडे पश्चिमवाडी येथे जमिनीच्या वादातून एका प्रौढ व्यक्तीस रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी विश्वानंद भीम महाडिक (वय ४८, रा. निरबाडे पश्चिमवाडी, चिपळूण; सध्या कळंबोळी, नवी मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास निरबाडे पश्चिमवाडी येथील कमानीजवळील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादी त्यांच्या मालकीच्या जमिनीवर सपाटीकरणासाठी डबर टाकण्याच्या कामानिमित्त वाहनाने चिपळूणहून निरबाडेकडे येत असताना, रोहन विलास महाडिक आणि विशाल विलास महाडिक यांनी पूर्वीच्या जमिनीच्या वादातून राग मनात धरून त्यांची गाडी अडविल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादींना वाहनातून खाली उतरवून विशाल महाडिक याने डोळा, कान आणि नाकावर थपडा मारून दुखापत केली.
यावेळी रोहन महाडिक याने हातातील काठीने फिर्यादीच्या हाताच्या दंडावर, पायावर आणि पाठीवर प्रहार करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादींचे सख्खे बंधू असलेले दयानंद भीम महाडिक यांनीही शिवीगाळ करत ‘तुला बघून घेतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी रोहन विलास महाडिक, विशाल विलास महाडिक आणि दयानंद भीम महाडिक (तिघेही रा. निरबाडे पश्चिमवाडी, चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

