( नवी दिल्ली )
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या मुलगी हिमानी पुरी यांनी Delhi High Court मध्ये अवमान याचिका दाखल केली आहे. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित कुख्यात व्यक्ती जेफ्री एपस्टाईन यांच्याशी आपले नाव जोडणारा ऑनलाइन मजकूर तात्काळ हटवण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. या प्रकरणावर न्यायालयात आज (17 मार्च) रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी
हिमानी पुरी यांनी त्यांच्या प्रतिष्ठेची गंभीर बदनामी झाल्याचा दावा करत 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. 22 फेब्रुवारीपासून जगभरातील विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर त्यांचे नाव जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी जोडणारे मजकूर आणि पोस्ट व्हायरल होत असल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. यामध्ये X (formerly Twitter), Google, Meta Platforms आणि LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक सामग्री प्रसारित झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ऑनलाइन कंटेंटमध्ये नेमका काय दावा?
काही ऑनलाइन लेख आणि पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हिमानी पुरी यांनी यापूर्वी न्यूयॉर्कमधील गुंतवणूक संस्था Realm Partners LLC येथे काम केले होते. त्या काळात जेफ्री एपस्टाईन आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून या संस्थेला निधी पुरवला जात असल्याचेही म्हटले गेले आहे. तसेच काही मजकूरात असा आरोप करण्यात आला आहे की, रॉबर्ट मिलर्ड नावाच्या व्यक्तीसोबत हिमानी पुरी यांनी मिळून लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेच्या पतनासाठी कट रचला होता. मात्र, हिमानी पुरी यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख
याचिकेत असेही म्हटले आहे की, आपण केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची मुलगी असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात आहे. हरदीप सिंह पुरी यांनी पूर्वी भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) महत्त्वाची भूमिका बजावली असून सध्या ते केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित कथित फाइल्समध्ये हरदीप सिंह पुरी यांचे नाव आल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आल्यानंतर संसदेतही याबाबत राजकीय गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते.

