(ठाणे)
ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. विशेष म्हणजे, गुन्हा लपवण्यासाठी पित्यानेही आरोपी पुत्राला साथ दिली, असा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात समोर आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, ऑनलाईन गेम्समुळे होत असलेल्या मानसिक बिघाडावर चिंता व्यक्त केली जात आहे.
वसई पश्चिमेतील बाभोळा भागातील पेरियार अपार्टमेंटमध्ये ६१ वर्षीय आर्शिया खुसरो या राहात होत्या. त्यांचा सावत्र मुलगा इम्रान खुसरो (३२) याला VRPO नावाच्या ऑनलाइन गेमचं गंभीर व्यसन होते. या गेमसाठी त्याला १ लाख ८० हजार रुपयांची गरज होती. इम्रानने ही रक्कम सावत्र आईकडे मागितली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या इम्रानने त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि डोकं आपटून त्यांची हत्या केली.
गुन्हा लपवण्यासाठी मृत्यूचा बनाव
हत्या केल्यानंतर इम्रानने ही माहिती त्याचे वडील आमिर खुसरो यांना दिली. त्यानंतर पिता-पुत्रांनी मिळून मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव केला. एका खासगी डॉक्टरकडून बनावट मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आले. शनिवारी संध्याकाळी आर्शिया यांच्यावर गुपचूप धार्मिक दफनविधी पार पाडण्यात आला.
रविवारी सकाळी घरकामासाठी आलेल्या महिलेला घरात रक्ताचे डाग आढळले. तिने तत्काळ संशय व्यक्त करून माहिती पोलिसांना दिली. ही बाब थेट पालघर पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांच्या आदेशावरून गुन्हे शाखा-२ च्या पथकाने तपास सुरू केला. २४ तासांत पोलिसांनी संपूर्ण बनाव उघडकीस आणत इम्रान आणि त्याचे वडील आमिर खुसरो यांना अटक केली. आरोपींविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने वसई परिसरात मोठी खळबळ उडवली आहे. ऑनलाईन गेम्सचं वाढतं व्यसन, आर्थिक ताणतणाव आणि भावनिक असंतुलन हे आजच्या तरुणांमध्ये धोकादायक वळण घेत असल्याचं या प्रकरणातून अधोरेखित होतं.