(महाड)
महाड एस.टी. स्टँडजवळील मोरेवाडी फलाटासमोरून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
फिर्यादी महिलेच्या माहितीनुसार, हनुमान वाडी, कावळे तर्फे विन्हेरे येथे राहणारी तिची १७ वर्षांची मुलगी आणि तिची १६ वर्षांची मैत्रीण या दोघी १९ जुलै रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास महाड एस.टी. स्थानकाजवळील मोरेवाडी फलाटासमोरून बेपत्ता झाल्या आहेत. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.