(बदलापूर)
जवळपास दीड वर्षांपूर्वी बदलापूर पूर्वेतील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा कथित एन्काऊंटर, नागरिकांचा उद्रेक आणि चक्का जाम आंदोलन आजही स्मरणात असतानाच, बदलापूरमध्ये पुन्हा एकदा तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर पश्चिमेतील एका खासगी इंग्रजी शाळेतील चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या मिनी बसमध्येच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी शाळा सुटल्यानंतर खासगी मिनी बसमधून घरी जात होती. त्या वेळी बसमध्ये केवळ चालक आणि ती मुलगी होती. याच संधीचा फायदा घेत बसचालकाने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलगी वेळेवर घरी न पोहोचल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली आणि शाळेशी संपर्क साधला. काही वेळानंतर मुलगी घरी परतल्यानंतर पालकांनी विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. नराधम चालकाने चिमुकलीला ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली होती.
हा प्रकार समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात आरोपी बसचालकाला अटक करण्यात आली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. पीडित चिमुरडीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शाळेतील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित शाळेत महिला मदतनीस नसल्याचे समोर आले आहे. शाळेच्या बस आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण करताना शिक्षण विभागाच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही पालकांकडून केला जात आहे.
या घटनेची माहिती समोर येताच बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला आघाडी आक्रमक होत कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्या मिनी बसमध्ये अत्याचार झाला, ती बस फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्या संगिता चेंडवणकर यांनी केला. “आरोपी आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. पोलिसांकडून जमावाला समजावण्यात आले असले तरी, या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

